अहमदपूर (जि. लातूर) : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीन वाजता जिवंत समाधी घेणार असल्याच्या अफवेने गुरूवारी (ता. २७) रात्रीपासून त्यांच्या येथील नांदेड रोडवरील भक्तीस्थळावर भाविकांनी मोठी गर्दी केली. गर्दीतच सोशल मिडियांवर महाराजांच्या व्हिडीओंनी अक्षरशः धुमाकूळ घातला. यामुळे भाविकांत गोंधळच वाढला.
या गोंधळातच महाराजांनी अहमदपूर व हडोळती (ता. अहमदपूर) येथील मठांसाठी आपले उत्तराधिकारी जाहीर केले व सायंकाळी साडेसहा वाजता पुढील उपचारासाठी ते नांदेडला रवाना झाले. यानंतर भक्तीस्थळावरील भाविकांची गर्दी ओसरली. यामुळे महाराजांच्या समाधी घेण्याच्या अफवेला पूर्णविराम मिळाला.
१०४ वर्ष वयाच्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी पाकीस्तानातील लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी मिळवली आहे. जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख आहे. शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील नांदेड रोडवर चौदा एकर परिसरात २००७ मध्ये महाराजांनी भक्तीस्थळाची स्थापना केली. या भक्तीस्थळावर महादेव मंदीर व प्रार्थना स्थळ असून तिथेच महाराजांचे वास्तव्य असते. भक्तीस्थळावर सामुहिक विवाहासाठी विनामूल्य जागा दिली जाते.
महाराजांचे मराठवाड्यात हजारो भक्त असून दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या अनुष्ठानालाही भाविकांची गर्दी होते. दोन दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांचे उत्तराधिकारी नेमण्यावरून चर्चा सुरू होत्या. या तणावातून त्यांनी अन्नत्याग केल्याचे सांगण्यात येत होते.
यामुळेच दोन दिवसापासून त्यांची प्रकृती बिघडली असून नांदेडनंतर त्यांच्यावर भक्तीस्थळावर बंद खोलीत उपचार सुरू होते. दरम्यान बाहेरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यास त्यांनी नकार दिल्याने ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली.यामुळे गुरूवारी रात्रीपासूनच भक्तांची भक्तीस्थळावर गर्दी वाढू लागली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शुक्रवारी गर्दी वाढत असतानाच सोशल मिडियावर महाराजांचे व्हिडीओ व्हायरल झाले. एका व्हिडीओतून त्यांनी प्रकृती चांगली असल्याचे सांगून मला व्यवस्थित रितीने जगू द्या`, असे आवाहन करत होते. तर दुसऱ्या व्हिडीओत ते उत्तराधिकारी निवड तसेच स्वतःच्या नियोजित अंत्यविधीवर बोलत होते. यामुळे भाविकांत गोंधळ वाढला. याबाबत महाराज स्वतःच संवाद साधून माहिती देतील, या आशेने भाविक दिवसभर भक्तीस्थळावर ठाण मांडून होते. अनेक व्हिडीओ सोशल मिडियांवर धुमाकूळ घालत असतानाच त्यांची भक्तांनी मनधऱणी केली. त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांचे नांदेड येथील शिष्य अविनाश भोसीकर, शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे, भगवंत पाटील चांभारगेकर महाराज व बिचकुंदेकर महाराज यांनी बंद खोलीतूनच ध्वनिक्षेपकावरून महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांची घोषणा केली.
यात अहमदपूर येथील मठासाठी राजशेखर विश्वंभर स्वामी तर हडोळतीच्या मठासाठी अभिषेक राजकुमार स्वामी यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. हे दोघेही महाराजांचे भाऊ मन्मथअप्पा स्वामी यांचे नातू आहेत. या घोषणेनंतर महाराज बंद खोलीतून बाहेर पडले व वाहनात बसून नांदेडला उपचारासाठी रवाना झाले. महाराज बाहेर येताच भाविकांनी त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या घोषणांनी भक्तीस्थळाचा परिसर निनादून गेला होता.
(संपादक-प्रताप अवचार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.